MarathiSocial

घरचा विरोधी पक्ष..

राज्य सरकारमध्ये जसा विरोधी पक्ष असतो,तसा तो घरामध्ये देखील असतो.पति जरी शासक, सरकार किंवा मालक असला तरी पत्नी देखील विरोधी पक्षाची भूमिका वठवित असते.सरकार प्रमाणे संसाराचे देखील दोन आधारस्तंभ असतात.
पत्नी आणि विरोधी पक्षांमध्ये इतके साम्य आहे की कुणी कुणाचे अनुकरण केले, ह्याचा शोध घ्यावा लागेल.विरोधी पक्षाप्रमाणे बायको देखील पतिला सतत विरोध करुन नामोहरम करुन सोडते.त्याच्या प्रत्येक चुकांवर अचूक बोट ठेवते.धाक आणि वचक ठेवते.घराबाहेर असले की बायकोचा फोन येतोच.आपला नवरा कसा आहे हे अखिल भारतीय विवाहित स्त्रिया ओळखून असतात.’बायकांची जागरुकता,हेच पुरुषांच्या यशस्वी संसाराचे गमक आहे.’असेही वक्तव्य करुन लोकांना विचारात पाडता येऊ शकते.
चहापानावर बहिष्कार टाकणे हे आद्यकर्तव्य आहे.विरोधी पक्षाप्रमाणे बायको सतत काहीतरी कुरबुर करत असते.
तिच्या अनाठायी मागण्या कधीच थांबत
नाही.’ बायकोची मनधरणी’ असे एखादे
पुस्तक वाचायला मिळाले तर बरे होईल.
विरोधी पक्षासारखे बायको सर्व आंदोलने
हाताळते.सत्ता दुसऱ्याची असली की ते कसं देखवत नाही,ह्याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे बायको.
दबावतंत्र हा एक इच्छित साध्य करुन घेण्याचा मार्ग असतो.माहेरी निघून जाण्याची धमकी अधुनमधून दिली की नवऱ्यावर बऱ्यापैकी वचक असतो,त्यासाठी बच्चे कंपनीचा पाठिंबा
आवश्यक असतो.
थाळीनाद हे उत्तम असे आंदोलन आहे.घर हे थाळीचे माहेरघर असते.उपलब्ध थाळी
नवऱ्याच्या उपस्थितीमध्ये बदडून काढली जाते.त्याचा नाद किंवा राग कानी घूमला की हे आंदोलन यशस्वी ठरते.
मौन हा बायकोच्या आंदोलनाचा अघोरी प्रकार आहे.शहाण्याला केवळ शब्दांचा मार,तसा मौनाचाही मार बसतो.त्याचे वळ
दिसत नसले तरी,पतिला वळणांवर आणण्यासाठी त्याचा उत्तम उपयोग होतो.
रास्ता रोको, हे आंदोलन तर नित्य करावे लागते.’ मी तुम्हाला जाऊ देणार नाही.”कसे
जाता तेच बघते पर्यंत .” मजल गेलेली असते.पतिच्या कोणत्याच नातेवाईकांकडे
जाऊ देण्यासाठी हे आंदोलन बायकोला
करावे लागते.
अन्नत्याग,पतिसाठी स्वयंपाक करून, स्वतः
उपाशी राहयचे या आंदोलनाचे वैशिष्ट्य असते.पति आपल्याशिवाय खातो का ह्याची ती परीक्षा असते.नवरा जर पोटभर जेवला तर हे आंदोलन अयशस्वी ठरते.अंगावर पांघरूण घेऊन झोपेचे सोंग
करता आले पाहिजे.” मला भूक नाही.”असे
व्याकुळ होऊन बोलता आले पाहिजे.आमरण उपोषणाचा हा प्रकार
वाटला पाहिजे.
बहिष्कार,हा आंदोलनाचा अहिंसक प्रकार आहे.गांधीवादी आंदोलन समजले जावे.पतिने बाजारातून खरेदी करून आणलेल्या प्रत्येक वस्तूवर बहिष्कार टाकला जातो.मला तुमचे काही नको, असं
बोलून त्यास किंकर्तव्यमूढ करता आले पाहिजे.त्याच्याकडून सर्व हवे असतांना,मला काही नको असं ठासून
बोलता आले पाहिजे.
सरकार प्रमाणे संसार देखील चालतो.विरोधी पक्षाशी जुळवून घेता आले की संसार सुखाचा होतो, किमान संसाराचे
वर्षे तरी कडेला लागतात.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button