विठाबाई नारायणगावकर – आयुष्याचा तमाशा झालेली कलावंत…
ढोलकी कडाडत होती. संबळाची तार ताणली जात होती, तबल्यावर थापा पडत होत्या. फड रंगात आला होता, एकमागून एक लावण्या सादर केल्या जात होत्या. लोक मनमुराद दाद देत होते. फेटे उडवत होते. सगळा दिलदार लोकांचा मामला होता तो. पटावर नाचणारी गव्हाळ वर्णाची ती तरुण पोर नाकीडोळी अत्यंत रेखीव होती. ‘ती’ अगदी मन लावून नाचत होती. पण मधूनच ‘तिच्या’ चेहरयावर वेदना स्पष्ट दिसत होत्या. तिचे पोट किंचित फुगल्यासारखे वाटत होते. खरे तर ‘तिला’ असह्य वेदना होत होत्या तरीही ‘ती’ देहभान हरपून नाचत होती. तिची लावणी संपताच ती पटामागे गेली, घाईने ‘तिने’ साडी फेडली अन पोटाचा ताण हलका झाला तसा ‘तिने’ थोडा श्वास मोकळा सोडला. पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळे होते. ‘तिला’ प्रसूतीच्या वेणा सुरु झाल्या आणि काही मिनिटात ‘तिची’ प्रसूती झाली देखील. इकडे फडावर दोनेक लावण्या होऊन गेल्या आणि सोंगाडयाची बतावणी सुरु झाली होती. ‘तिच्या’ मात्र वेदनांना अंत नव्हता. सोंगाडयांची बतावणी संपली, पुढची लावणी सुरु होताना लोकांनी ‘तिच्याच’ नावाचा धोशा सुरु केला.
पण तिची सहकलाकार एव्हाना पुढच्या लावणीसाठी मंचावर दाखल झाली होती. लोकांनी तिची लावणी सुरु होण्याआधीच शिट्ट्या फुकायला सुरुवात केली. खुर्च्यांचा आवाज करायला सुरुवात केली. हार्मोनियमवाला बिथरून गेला आणि त्याचे काळीपांढरीचे गणित चुकू लागले. कशीबशी ती लावणी संपली. तोवर ‘तिने’ दगड हाती घेऊन नाळ तोडून काढली आणि आपल्या बाळाला स्वतःपासून विलग केले, आणि पुन्हा कासोटा आवळून साडी नेसली आणि फडावर जाऊन उभी राहिली. तिने जीव तोडून लावणीवर नाचली. त्या लावणीचे बोल होते, ‘पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची!’
ती नाचतच होती, ‘तिच्या’वर आणि ‘तिच्या’ कलेवर फिदा झालेल्या लोकांना तिच्या डोळ्यातून वाहणारे पाणी दिसत नव्हते. तिच्या पायातले चाळ ‘तिला’ मणामणाचे वाटत होते. सगळा रंगमंच तिच्या भोवती जणू फेर धरून नाचत होता. तिला चकरा येऊ लागल्या. ती कोसळण्याच्या बेतात यायला आणि लावणी संपायला एकच गाठ पडली. कशीबशी ती पडद्यामागे गेली आणि तिथे जाऊन कोसळली. तिची अदाकारी अन तिचा नाच बघणारया लोकांनी काही वेळापूर्वी ‘तिची’ प्रसूती झाली होती यावर विश्वास ठेवला नसता. पण ‘तिने’ इतिहास रचला होता ! ही घटना घडली होती पंढरपुरात आणि जिच्या वाटेस हे भोग आले होते. तिचा जन्मही एका बेभान आषाढी एकादशीच्या रात्रीस झाला होता ! तिचे नाव होते विठा !!
विठाच्या जन्माच्या वेळेस चंद्रभागेच्या तीराला चिक्कार पाणी आले होते. पावसाची रिपरिप सातत्याने सुरु होती. नदीकाठची थंड हवा रात्रभर शहरात जाणवायची. सगळ्या आषाढी यात्रेच्या निमित्ताने पंढरीत जत्रेचा माहौल तयार झाला होता. वेगवगळे विक्रेते आणि मनोरंजनाची साधने यांची जंत्रीच लागली होती. अगदी तमाशाचे फडही जोमात आले होते. वारकरयांचे फड जसे नामभक्तीत न्हाऊन निघाले होते. तसे निखळ मनोरंजनाच्या आराधनेत काही लोक दंग झाले होते. तिथे एक अघटीत घडले होते. धार्मिक व अध्यात्मिक आनंदाव्यतिरिक्त इतरही उद्देश्याने आलेले हौसे गवसे आणि नवसे यांची एकच मांदियाळी झाली होती. या लोकांत सर्व प्रकारचे आणि सर्व विचाराचे, अनेक स्तरावरचे लोक असतात. वारीचा अध्यात्मिक आनंद घेणारे लोक जसे असतात तसेच बारीचा आनंद घेणारे लोकही काही कमी नसतात. अशाच एका बारीत विठाचा जन्म झाला होता.
भाऊ बापू (मांग) नारायण गावकरांचा तमाशा त्या काळी महाराष्ट्र गाजवत होता. पंढरपूरातील मुक्कामात भाऊ खुडेंच्या पत्नी शांताबाई या तेंव्हा गरोदर अवस्थेत होत्या. ती आषाढी एकादशीची रात्र होती. रात्री भाऊंच्या तमाशाचा फड उभा राहिला आणि इकडे शांताबाईंच्या वेणा वाढू लागल्या. मध्यरात्रीच्या सुमारास शांताबाईंनी एका गोंडस मुलीला जन्म दिला. पंढरपूरच्या विठोबाच्या छायेत मुलगी झाली म्हणून भाऊ आणि शांताबाईंनी तिचं नाव विठा’ ठेवलं. तमाशाच्या फडाला आणि पहाटेच्या सूर्याला साक्षी ठेवून जन्माला येऊन विठा’नं जणू नेमकी वेळ साधली. कारण विठा’ नामक हे नक्षत्र पुढे तमाशा विश्वावर तेजाने तळपलं. या विठा’ने उभ्या महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवलं. विठाबाई भाऊ !
नारायणगावकर या नावाने तमाशाला दिल्लीच्या तख्तापर्यंत नेलं.
पुढे `विठा’ने उभ्या महाराष्ट्राला आपल्या तालावर नाचवलं. विठाबाई भाऊ नारायणगावकर या नावाने तमाशाला दिल्लीच्या तख्तापर्यंत नेलं. त्या नेमकं कसे जीवन जगल्या, त्यांची कला, निष्ठा बहराचा काळ, त्यांनी उपभोगलेले ऐश्वर्य आणि त्यांची झालेली फसवणूक या सर्वच गोष्टी मुलखावेगळ्या आहेत.
लहानपणापासूनच नृत्य आणि गायनाकडं विठाबाईंचा विशेष ओढा होता. घरी असताना तमाशातल्या लावण्या, गवळणी, भेदीक त्यांच्या कानावर आपसूक पडत होत्या. पण शाळेतही कवितेमध्ये विशेष रुची होती. त्यांचा हा कलेकडचा आत्यंतिक ओढा बघूनच वडिलांनी शिक्षणाची सक्ती केली नाही आणि वयाच्या चौथ्या – पाचव्या वर्षीच विठाबाईंची शाळा कायमची बंद झाली. आणि आपल्या वडिलांच्या तमाशाबरोबर भटकंती सुरू झाली. याच सुमारास मामा वरेरकर – आळतेकर आपल्या कलापथकातून एकांकिका आणि पथनाटय़ाच्या माध्यमातून समाजजागृती करत होते.
भाऊ-बापूच्या तमाशात अधून-मधून विठाबाई आपल्या कलेची चुणूक दाखवित होत्या. ही कला मामा वरेरकरांनी नेमकी हेरली आणि विठाबाईंना आपल्या कलापथकात पाठवून द्यायची विनंती भाऊंना केली. भाऊंनी ती तात्काळ मान्य केली. आयुष्यात पहिल्यांदा विठाबाईंनी वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे रॉकेलचे टेंभे लावून झालेल्या तमाशात लावणी सादर करून रसिकांची मने जिंकली आणि तेव्हापासूनच खऱ्या अर्थाने विठाबाईंच्या तमाशामय आयुष्याला सुरुवात झाली.
एकदा भाऊ-बापूंचा तमाशा कोळे या गावी मुक्कामाला होता. तिथं भाऊ अकेलकर यांनीही आपल्या तमाशाचा फड उभारला होता. दोन्ही फडांनी एकमेकांना आव्हान दिलं आणि त्या रात्री दोघांमध्ये भेदीक’ सुरू झाली. सवाल-जबाब सुरू झाले. कुणीच कुणीच कुणाला हार जात नव्हतं. पण अकेलकरांच्या नुकत्याच वयात आलेल्या मुलीने, ‘अशी कोणती रूपाची खाण तुझ्या गाठीला आहे’, असा सवाल करत बापूंना निरुत्तर केलं. भाऊंना ही हार जिव्हारी लागली. या पराभवानं विठाबाईही पेटून उठल्या आणि लागलीच बाडबिस्तारा आवरून कराडच्या वाटेला लागल्या.
कराडमधल्या रात्रीतही या दोन्ही तमाशात भेदीक जुंपली आणि ती जुगलबंदी जिंकून विठाबाईंनी आपल्या वडिलांना हरविल्याचा पुरेपूर बदला घेतला. त्या रात्री विठाबाईंचं बोर्डावर पाय ठेवणं ऐतिहासिक होतं. ती त्यांच्या पुढच्या देदिप्यमान प्रवासाची नांदी होती. त्या वेळी विठाबाई फक्त तेरा वर्षांच्या होत्या. तमाशा फडावरील सर्व अपरिहार्यतेचा स्वीकार करुन तमाशा कलावंताचं कलंदर जगणं काय असतं, ढोलकीच्या तालातून आणि घुंगराच्या बोलातून साकारणारी कलेची उर्जा कशी असते, हे विठाबाईंचा तमाशा पाहिलेल्या प्रत्येक रसिकाच्या आठवणीत आजही साठवलेले आहे.
वयाच्या अकराव्या वर्षांपासून घुंगरांचे पाच किलोचे चाळ पायी बांधून त्याच्या तालावर नाचू लागलेल्या विठाबाई वयाच्या सत्तरीपर्यंत तमाशाफडात सम्राज्ञीच्या थाटात वावरल्या. तमाशा प्रकारात राष्ट्रपती पुरस्कार मिळालेल्या त्या पहिल्या स्त्री कलाकार होत्या. प्रचंड प्रसिध्दी, मानसन्मान आणि पैसा मिळूनही उतारवयात त्यांच्या आयुष्यात लाचारीच आली.
तमाशाची कला जोपासत असताना विठाबाईंचे स्वत:चा संसार, मुलाबाळांकडे दुर्लक्ष झाले़. पर्यायाने कुटुंबाची वाताहात झाली़. मात्र, या लोककलेवर त्यांनी निष्णात प्रेम केले. अनेक हिंदी-मराठी चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी त्यांना चित्रपटांत काम करण्यासाठी स्वत:हून अनेक ऑफर दिल्या होत्या; मात्र तमाशावर मनापासून प्रेम करणाऱ्या विठाबाईंनी केवळ तमाशासाठी चित्रपटांमध्ये काम करण्याचे नाकारले.
जिवंतपणी अनेक हालअपेष्टा सहन करीत येणाऱ्या संकटांना खंबीरपणे तोंड देत महाराष्ट्राची लोककला म्हणून ओळखल्या जाणा-या तमाशासाठी स्वत:ला झोकून देऊन स्वत:च्या आयुष्याचाच ‘तमाशा’करून घेणाऱ्या विठाबाईंचा १५ जानेवारी २००२ मध्ये निवासस्थानी मृत्यू झाला. एका लोककलेचा अस्त अशा शब्दांत अनेक मंत्र्यांनी व राजकारण्यांनी त्यांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला. विठाबाईंच्या स्मरणार्थ राज्य शासनाने १२ फेब्रुवारी २००६ ला नारायणगाव येथे पहिला तमाशा महोत्सव आयोजित केला होता़. या तमाशा महोत्सवात सरकारने विठाबाईंच्या स्मारकाबाबत जाहीर घोषणा केली होती; मात्र आजपर्यंत विठाबाईंच्या स्मारकाबाबत राज्य शासनाने कोणतीही प्रगती केलेली नाही.
अश्या प्रकारची अजून पोस्ट बघण्यासाठी लिंक बघा
समाजात घडणाऱ्या ताज्या घडामोडी त्यांनी तमाशाच्या मंचावरून अत्यंत प्रभावी व सहजपणे मांडून विविध विषयांद्वारे त्यांनी समाजप्रबोधन केले. १९६२ च्या भारत-चीन युद्धादरम्यान विठाबाईंना नेफा आघाडीवर जाऊन जवानांचे मनोरंजन केले होते. १९९० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती आर. व्यंकटरमण यांच्या हस्ते विठाबाईंना सुवर्णपदक देऊन गौरविण्यात आले होते. योगीराज बागूल यांची `तमाशा विठाबाईंच्या आयुष्याचा’ ही कादंबरी वाचनीय आहे . मंगला बनसोडे, मालती इनामदार या त्यांच्या कन्या आहेत. आपल्याच माणसांनी पाठीत खंजीर खुपसल्याने त्यांच्या हाती भिकेचा कटोरा आला. खोऱ्याने पैसा कमावलेल्या विठाबाईंना सरकारी मानधनावर जगण्याची वेळ आली. त्यांनी सोसलेल्या या यातनांना स्पर्श करणाऱ्या ‘तमाशाची राणी, लावणी साम्राज्ञी विठाबाई’ या नाटकावरही रसिकांनी प्रेम केले.
आपल्या जीवनाचा तमाशा बनवून ज्यांनी लोकांचे मनोरंजन हा एकच धर्म समजून त्याचे मनोभावे जतन केले त्या तमाशाकलावंतांच्या मुकुटमणी समजल्या जाणाऱ्या विठाबाईंच्या स्मृतींना अभिवादन …